छत्रपती शिवरायांच्या कार्याचा त्रयस्थ नजरेतून वेध


देशातील ज्येष्ठ इतिहासकार व आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेतलेले जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांवर बरीच पुस्तके लिहिली. त्यांच्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकाची आवृत्ती आजही खूप लोकप्रिय आहे. या पुस्तकाची पाचवी आवृत्ती १९५२ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांचे दुसरे पुस्तक म्हणजे ‘हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी’ या पुस्तकात त्यांनी १९०७ पासून विविध मासिकांमध्ये इतिहासविषयक लेखन केले, विविध घटनांच्यानिमित्ताने काही प्रकरणे लिहिली. त्याच समावेश या पुस्तकात आहे.  शिवाजीमहाराजांसंबंधी जितके जास्तीत जास्त कागद मिळाले, त्यावरून त्यांनी हे नवे नवे लेखन केले. त्या सगळ्या लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. फारसी हस्तलिखितांचे स्रोत, राजस्थानी पत्रव्यवहार, पोर्तुगिज कागदपत्रे, फ्रेंच पुस्तके, इंग्रज राजवटीतील तसेच त्यांच्या वखारीमध्ये काम कऱणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विविध नोंदी या संबंधीचे अनेक दस्तऐवज तपासून त्यांनी या पुस्तकात तपशीलवार माहिती दिली आहे. 

महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आधीचा कालखंड जो फारसा कुणाला माहीत नाही, तो त्यांनी विस्ताराने दिला आहे. यदुनाथ सरकारांचे वैशिष्ट्य म्हणजे सखोल अभ्यास करून आपली निरीक्षणे ते नोंदवतात, त्यामुळेच या पुस्तकात चोवीस प्रकरणांमधून अत्यंत मोलाची माहिती ते देतात. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात मुस्लिम राजवटीचे क्षेत्र कसे होते, त्यांचा प्रभाव कुठे कुठे आणि कसा होता याबद्दल नेमके भाष्य ते करतात. मोगली राजवटीत मलिक अंबर नावाचा एक उत्तम प्रशासक महाराष्ट्रात होऊन गेला, त्याचे अत्यंत विस्तृत असे चरित्र ते या पुस्तकात देतात, तसेच छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे यांच्या संबंधी चार प्रकरणांमध्ये ते जी माहिती देतात, त्यातून शहाजी राजांचे मोठेपण तर कळतेच पण अनेक राजवटींचे ते आधारस्तंभ होते, तेही लक्षात येते. छत्रपती शिवरायांसंबंधी त्यांची या पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत. त्यातून ते छत्रपतींच्या कार्याचा अत्यंत वस्तुनिष्ठपणे आढावा घेतात. छत्रपती शिवरायांची थोरवी त्याबद्दल तर ते नेमक्या शब्दात आणि आकडेवारीनिशी खूप मोठा तपशील आपल्यासमोर मांडतात. 



हे सारे करत असताना या पुस्तकात ते छत्रपती संभाजीमहाराज, राजाराम महाराजांचे जिंजींमधील आगमन, औरंगजेबाचे अखेरचे खलिते अशा प्रकरणांमधून जवळ जवळ शंभर -दीडशे वर्षांचा मोठा कालपट आपल्यासमोर उलगडतात. याचबरोबर या पुस्तकातील ‘महाराष्ट्राचा निधड्या छातीचा नायक’ या प्रकरणामध्ये धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची माहिती देतात, तसेच या दोन महान सेनानींच्या कार्यपद्धतीतील उणिवांवरही परखडपणे बोट ठेवतात. या पुस्तकातील २३ आणि २४ ही जी दोन प्रकरणे आहेत, ती आवर्जून वाचलीच पाहिजेत अशी आहेत. संभाजी महाराजांच्या पदरी जे राजकवी होते, त्या राजकवींबद्दल आणि मराठी मुलुखामध्ये तांत्रिक उपासना कशी मूळ धरली गेली, तांत्रिक उपासनेमुळे कवी कलश आणि त्यांच्या बरोबरीचे अनेक लोक महाराष्ट्राच्या तत्कालीन समाजजीवनात किती भक्कमपणे स्थिरावले होते, त्याचा अंदाज येतो. तांत्रिक मांत्रिकांची राजसत्तेतील लुडबूड किती होती त्यावरून इथल्या मंडळींना त्यांचा किती राग होता तेदेखील या पुस्तकामुळे कळते. तसेच २४ व्या प्रकरणात ‘महाराष्ट्राकडून आपल्याला मिळणारी शिकवण’ यामध्ये ते महाराष्ट्राला असलेला दुहीचा शाप यावर मर्मभेदी शब्दांत भाष्य करतात. पण त्यांच्यासारख्या त्रयस्थ माणसाने तटस्थपणाने केलेले हे मूल्यमापन आवर्जून वाचण्यासारखे आहे. 



याचबरोबर या पुस्तकातील ‘शिवाजीमहाराजांचा वारसा’ हे प्रकरण आवर्जून वाचले पाहिजे. जदुनाथ सरकार यांनी यासाठी विविध बखरी तसेच विविध हस्तलिखिते आणि अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून छत्रपती शिवरायांच्या वैभवशाली मालमत्तेचा वेध इथे घेतला आहे. पुस्तकामधील ऐतिहासिक माहितीबरोबरच जदुनाथ सरकारांनी इतिहासकार राजवाडे, तसेच वा. वा. खरे, द. ब. पारसनीस आणि काशिनाथ नारायण साने या तीन इतिहासकारांचा तपशीलवार परिचय करून दिला आहे. ही तीनही प्रकरणे म्हणजे या तीन इतिहासकारांचे  नुसते स्मरण नसून इतिहासलेखनासाठी या तीन महान लेखकांनी केवढे परिश्रम घेतले याचा अभ्यासपूर्ण वेध आहे. परराज्यातील एखाद्या इतिहासकाराने महाराष्ट्रातील या तीन इतिहासकारांचा जो गौरव केला आहे, तो गौरव छत्रपती शिवरायांच्या विचारांची  पूजा करणाऱ्या मंडळींचाच गौरव आहे. चारशे पानांच्या या पुस्तकातून छत्रपती शिवरायांच्या आधीचा आणि नंतरचा खूप मोठा कालखंड आपल्याला समजतो, त्या वेळच्या कालखंडाचा आणि त्या वेळच्या अनेक घटनांचा अन्वयार्थ लावायला चांगलीच मदत होते. तसेच मराठी लेखकांपेक्षा देशातील इतर लेखक या महान वारशाकडे कसे बघतात हे देखील समजते.  



---------------------------------------------------

पुस्तकाचे नाव : हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी - मराठा इतिहासावरील अभ्यास आणि कागदपत्रे : राजेशाही राज्यपद्धतीचा कालखंड

लेखक : जदूनाथ सरकार

अनुवाद : मीना शेटे - संभू

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे 

पृष्ठे : ३८४ मूल्य : ४५० रुपये.  

-----------------------------------------


(पूर्व प्रसिद्धी - ‘सरकारनामा’ शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी माणसाच्या अविनाशी उद्योग संस्कृतीचा स्वाभिमान बिंदू

लोकसहभागाच्या नियोजनातून विश्‍वविक्रम...

‘वाचनरंग’ च्या पुनरागमनाच्या निमित्ताने,