लोकसहभागाच्या नियोजनातून विश्वविक्रम...
एखादी व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात असेल तर त्याचा लोकांशी असलेला संपर्क आणि त्यांना तो कशा पद्धतीने एकत्र करू शकतो यावर त्याच्या हातून होणाऱ्या कामाचे भवितव्य ठरते. अर्थातच हे सगळ्याच नेत्यांना तसेच समाजकारण्याना लागू होते. या पार्श्वभूमीवर राजेश पांडे यांच्या ‘गिनीजगाथा’ या पुस्तकाचे वेगळेपण लक्षात येते. हे खरेतर एका कार्यकर्त्याच्या नियोजनाचे व त्याने साकारलेल्या वेगळ्याच उपक्रमाचे ‘डॉक्युमेंटेशन’ आहे. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी करणारे कुशल संयोजक म्हणून पांडे यांची ओळख आहे. पण पांडे यांचे काम केवळ त्यापुरतेच मर्यादित नाही, त्याच्या अनेक कामापैकी ते एक
काम असा प्रकार आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथल्या राजेश पांडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन संघटनांशी संबंध आला आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. पांडे यांनी परिषदेचे काम सुरू केले आणि विविध उपक्रम राबवत असताना त्यांनी अनेक प्रश्न हाती घेतले. मुळात विद्यार्थ्यांसमोर कोणती आव्हाने आहेत आणि त्यावर मार्ग कसा काढता येईल यावर त्यांनी विचारमंथन करून काही उपाय शोधले. १९८३ मध्ये जळगावमध्ये जिल्हा पातळीवर ‘मागणी परिषद’ आयोजित केली होती. जिल्ह्यातील मुलांच्या समस्या समजावून घेऊन त्याचा कृतिशील आराखडा तयार करण्यासाठी ही मागणी परिषद होती. पांडे यांनी या परिषदेसाठी दोन हजार विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात यश मिळवले, त्यानंतर लगेच १९८४ मध्ये ‘युवा अधिकार परिषद’देखील यशस्वी करून दाखविली. या परिषदेसाठी साडेचार हजार विद्यार्थी एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी आदिवासी विद्यार्थांचा मोर्चा मुंबईत नेला. त्यानंतर राज्यभरातून मुंबईत काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चा वेळी तर त्यांनी वेगळाच विक्रम घडवला. मुंबईतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी डबे आणण्याचे आवाहन केले आणि थेट ८० हजार डबे गोळा झाले. पांडे यांचे आज गिनीज बुकासाठीचे वेगवेगळे विक्रम वाचताना लक्षात येते की त्यांच्या विक्रमाची पायाभरणी त्यावेळी म्हणजे ‘मोर्चाला डबे आणण्यात’ यश मिळवताना झाली होती, ते त्यांचे पहिले पाऊल होते, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. विद्यार्थी परिषदेचे काम करताना आपण ४० लाख विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत आहोत अशी भावना मनात रुजली असे पांडे आवर्जून सांगतात. त्याचबरोबर आपल्या कामाची दिशा सांगताना ते म्हणतात ‘इतिहासातून प्रेरणा घेत, वर्तमानात कार्य करत, भविष्यासाठी दिशा ठरवण्याचा प्रवास करायचा’ असे मी निश्चित केले. पांडे ज्यावेळी युवा परिषदेचे काम करत होते त्यावेळी अन्य एका संघटेनच्या वतीने नागपूरमध्ये अशीच भव्य परिषद भरवण्यात आली होती, मात्र त्यावेळी जमलेल्या युवकांनी अनुचित व्यवहार व वर्तन केले, त्याची राज्यातच नाही तर देशभर चर्चा झाली. पांडे या अनुभवाबद्दल सांगतात, ‘‘ विद्यार्थांनी कसे वागायचे व कशा पद्धतीने वागायचे नाही याचा धडा आम्हाला त्या प्रकरणातून मिळाला’’. आमच्या परिषदेला आलेल्या विद्यार्थांनी अत्यंत चांगले वर्तन केल्याने दोन संघटनांमधला मूलभत फरकच लोकांच्या लक्षात आल्याचे पांडे सांगतात. १९८५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ होते त्यावेळी पांडे यांनी अनेक योजना राबवल्या. आपल्या योजना राबवताना त्याचे सूत्रबद्ध नियोजन आणि त्यासाठी अफाट मेहनत घेण्याची तयारी यामुळे पांडे एकेक कामाचा गड जिंकत गेले. जळगावमध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटपर्यंत गेला. त्यावेळी त्यांना प्रारंभी झालेला विरोध ते अगदी थोडक्यात सांगतात. आपल्या विचारांना होणारा विरोध त्यांनी आपल्या कामातून कसा कमी होईल याकडे लक्ष दिले. नेहमी सकारात्मक पद्धतीने काम करत असताना प्रचंड ऊर्जा घेऊन काम करायचे हाच पांडे यांचा खाक्या राहिला आहे. त्यामुळे पुण्यात आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा उपक्रम गिनीज बुकमध्ये कसा नोंदवला त्याची माहिती दिली आहे. केवळ
मोठे स्वप्न पाहून चालत नाही तर त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. गिनीजबुकमध्ये नोंद घेण्यासाठी किती सूक्ष्म नियोजन व संघभावनेने काम करावे लागते याची १२ उदाहरणे त्यांनी इथे दिली आहेत. एखादी चुक सगळ्यांच्या मेहनतीवर कसे पाणी फिरवू शकते याचाही तपशील ते सांगतात.
पांडे इथे गिनीजबुकमधल्या विक्रमाची नोंद सांगतातच पण त्यासाठी एक टिम म्हणून कितीजण राबले, त्याचा सगळा वृत्तान्त सांगतात. एक लेखक व एक कार्यकर्ता कसा घडत जातो ते या पुस्तकातील माहितीवरून कळते. जनभावना आणि रचनात्मक कामाची संकल्पना तसेच त्याला लोकसहभागाची जोड आणि या सगळ्यांसाठी नियोजनबद्ध कष्ट केले तर कसा इतिहास घडू शकते याची माहिती या पुस्तकातून मिळते. ‘कार्यावरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास आणि जे काही करायचे ते भव्यदिव्य आणि आदर्श घडवणारे’ या तीन गोष्टी माझ्या मनात रुजल्या असं पांडे एका ठिकाणी या पुस्तकात सांगतात. त्यांच्या कामाची ओळख आणि त्यांच्या कामाचा झपाटा दर्शवणारे हे गुण आहेत, त्याची प्रचिती या पुस्तकातील माहितीवरून येते. एका विक्रमाच्यावेळी गिनीजबुकाच्या निरीक्षकांनी झालेल्या सगळ्या कामाबद्दल शंका व्यक्त केली. संयोजकांची टीम एकदम हतबल झाली. पांडे यांना या उपक्रमात प्रचंड सहकार्य करणारा माणूसही दचकला, आतपर्यंत सगळे उपक्रम त्याच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले होते पण आता त्याच्या आजारपणामुळे आणि निरीक्षकांच्या त्या वक्तव्यामुळे त्याचा त्याक्षणी उत्साहच गेला होता. प्रसंग बाका होता, पण अशावेळी न खचता, न घाबरता पांडे यांनी समोर बसलेल्या अफाट समुदायाला संबोधित केले आणि सांगितले की आत्ता आपण केला तो सराव होता, आता आपल्याला खऱ्या अर्थाने हेच काम करायचे आहे. त्यामुळे लोकांना काही चुकले आहे असे वाटलेच नाही, सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा तो उपक्रम तितक्याच तडफेने आणि उत्साहात केला आणि जो विक्रम होईल की नाही अशी शंका काही क्षणांपूर्वी वाटत होती तो विक्रम तितक्याच ताकदीने नोंदवला गेला. पराजयाचे रूपांतर विजयात करणारे पांडे यांची टीम वाचकांना एका वेगळ्याच जगात नेते. आपल्या प्रत्येक उपक्रमात सहकार्य केलेल्या माणसाचे त्यांनी इथे आवर्जून कौतुक केले आहे. मिलिंद वेर्लेकर यांचा या सगळ्याच उपक्रमात कसा सिंहाचा वाटा आहे हे जसे पांडे सांगतात तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांचे नाव देण्याचा त्यांचा प्रयत्न इथे दिसतो. हा विक्रम माझ्या एकट्याचा नाही तर सर्व टीमचा आहे असे ते सतत सांगतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असून हीच त्यांच्या यशस्वी नेतृत्वाची गुरुकिल्ली असल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवते.
00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
पुस्तकाचे नाव : युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा
लेखक : राजेश पांडे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे : १२६ मूल्य २५० रुपये.
----------------------------------------------------------
पुस्तकासाठी प्रकाशकांचा फोन नंबर - ०२० २४४७६९२४ व २४४६०३१३
मोबाईळ क्रमांक - ९५४५०००५१३
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००
(लेखाची पूर्वप्रसिद्धी सरकारनामा राजकीय साप्ताहिक )

Comments
Post a Comment